अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- धूम स्टाईले महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्या काही टोळ्या पोलिसांनी मध्यंतरी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या.
आता पुन्हा धूम स्टाईल चोरट्यांनी धूमाकुळ सुरू केला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.
बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरातील समतानगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बुधवारी दुपारी समतानगरमधील महिला रस्त्याने पायी चाललेली असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी काही क्षणात त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.
घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास सुरू केला आहे.