अहमदनगर बातम्या

महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही फक्‍त फसवणूकीची होती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही फक्‍त फसवणूकीची होती. भ्रष्‍टाचाराने सरकार पूर्णपणे बरबटले गेले आहे. कोणत्‍याही समाज घटकाला हे सरकार न्‍याय देवू न शकल्‍याने

या सरकारने माफीनाम्‍याच्‍या जाहीराती प्रसिध्‍द केल्‍या पाहीजेत अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केली.

महाविकास आघाडीला दोन वर्षे पुर्ण झाल्‍याबद्दल माध्‍यमांनी विचारलेल्‍या प्रश्‍नाला आ.विखे पाटील यांनी उत्‍तर देताना सरकारच्‍या जनता विरोधी धोरणावर सडकून टिका केली. मागील दोन वर्षात महिला अत्‍याचाराच्‍या मोठ्या प्रमाणात घटना घडल्‍या.

कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यात सरकारला पुर्णत: अपयश आले आहे. राज्‍यातील शेतकरी निर्माण होत असलेल्‍या समस्‍यांमुळे आपले जिवन संपवून घेत आहे. या सरकारच्‍या काळात एमपीएसीच्‍या विद्यार्थ्‍यांनाही आत्‍महत्‍या कराव्‍या लागल्‍या हे दुर्दैव असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

एका महिलेच्‍या मृत्‍यूमुळे मंत्र्यांना घरी जावे लागले. सरकारमधील मंत्र्यांच्‍या भ्रष्‍टाचाराची प्रकरण रोजच चव्‍हाट्यावर येत आहेत. त्‍यामुळे जनतेच्‍या मनातील सरकारची प्रतिमा मलिन झाली असून, सामान्‍य माणसाच्‍या वेदना या सरकारला कळल्‍या नाहीत. सरकार दोन वर्षात फक्‍त घोषणा करुन, निर्णय करत बसले.

अंमलबजावणी मात्र शुन्‍य होती. घेतलेले निर्णयसुध्‍दा या सरकारला मागे घ्‍यावे लागले त्‍यामुहे हे युटर्न सरकार असल्‍याची टिका आ.विखे पाटील यांनी केली. एसटी चे कर्मचा-यांच्‍या संपाबाबत बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, सरकारने वेगवेगळे पर्याय उपलब्‍ध करुन, त्‍यांना आश्‍वस्‍त केले पाहीजे.

पण सरकारची इच्‍छाशक्‍ती नाही, त्‍यांच्‍या आंदोलनाला आमचा पाठींबाच असल्‍याचे त्‍यांनी ठामपणे सांगितले. दोन वर्षे झाल्‍याबद्दल सरकारने प्रसिध्‍द केलेल्‍या जाहीरातींबाबत प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना विखे पाटील म्‍हणाले की,

धन्‍यवाद तुम्‍ही नेमके कोणाचे मानत आहात. जनतेची फसवणूक केल्‍याबद्दल तुम्‍ही माफीनामे काढले पाहीजेत असा टोलाही आ.विखे पाटील यांनी लगावला.

Ahmednagarlive24 Office