अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. मात्र आता नगर अर्बन मल्टिस्टेट शेडयुल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
तब्बल दोन वर्षांनी होणार्या या निवडणुकीसाठी मंगळवारपासून (दि.26) इच्छुकांचे उमदेवारी अर्ज स्वीकृती सुरू होणार आहे. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी प्रारूप मतदार यादी जाहीर करत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.
बँकेच्या 18 जागांसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाणनी होणार आहे.
त्यानंतर वैध उमेदवारी अर्जांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून, 15 नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी 56 हजार मतदार असून 1 हजाराचे शेअर्स असणार्या मतदानाचा अधिकार आहे.