Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक आदर्श शाळा, आदर्श शिक्षक आहेत. बऱ्याचवेळा शिक्षकांचा, त्यांच्या कामाचा विद्यार्थी तथा पालकांना लळा लागलेला असतो. आता पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर ईजदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थी, ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिक्षकांची झालेली बदली रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोक आंदोलन केले.
येथील ग्रामस्थांनी शिक्षकाची बदली रद्द व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाकडे केली होती. याची दखल न घेतल्याने संतप्त झालेले ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले. तसेच मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला. त्यामुळे वातावरण थोडे तणावाचेही बनले होते.
नेमके काय आहे प्रकरण?
चिंचपूर ईजदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ६६ विद्यार्थ्यांचा पट आहे. या शाळेत तीन शिक्षक आहेत. परंतु येथून एका शिक्षकाची बदली झाली. हे समजताच पालकांनी शिक्षकाची बदली रद्द करावी, अशी भूमिका घेत दोन वेळा पंचायत समितीकडे लेखी तक्रार केली. परंतु याचा विचहर केला गेला नाही असे पालकांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार न करता असे धोरण राबवत असल्याचा आरोप पालकांनी केला. जोपर्यंत शिक्षकांची बदली शिक्षण विभाग रद्द करीत नाही, तोपर्यंत आपल्या पाल्याला शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालक व शालेय व्यवस्थापन समितीने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.