अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- शिरसगाव (ता. नेवासा) येथील सराईत गुन्हेगार सागर रोहिदास मोहिते याने दिलेले चार गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान एक जण पसार झाला असून मोहितेही पोलिसांना मिळून आलेला नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहे. किशोर बाळासाहेब खामकर (वय 32 रा. राजुरी ता. राहाता), किशोर साईनाथ शिणगारे (वय 28 रा. गोमळवाडी ता. नेवासा), अभय अशोक काळे (वय 24 रा. शिरसगाव ता. नेवासा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विवेक लक्ष्मण शिंदे (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) हा पसार झाला आहे. दरम्यान सर्व गावठी कट्टे व काडतुसे शिरसगाव (ता. नेवासा) येथील सराईत गुन्हेगार सागर रोहिदास मोहिते याने दिले असल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
सागर मोहिते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द नेवासा, सोनई, अंबड (जि. नाशिक) पोलीस ठाण्यात मारहाण, आमली पदार्थ, दारूबंदी, घातक शस्त्रे बाळगणे, विक्री करणे असे गंभीर स्वरूपाची सहा गुन्हे दाखल आहेत.
काही इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथे येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, भिमराज खर्से, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के यांच्या पथकाने राहुरी फॅक्टरी परिसरात सापळा लावला.
दुचाकीवरून आलेल्या संशयित दोन व्यक्तींना पथकाने पकडले. त्यांना नावे विचारली असता त्यांनी किशोर खामकर आणि किशोर शिणगारे अशी सांगितली.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता दोन गावठी कट्टे व सहा काडतुसे मिळून आली. पोलिसांनी गावठी कट्टे, काडतुसे व दुचाकी असा एक लाख 21 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून
त्यांच्याविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नगर-औरंगाबाद रोडने दोन इसम नगरकडे गावठी कट्टे विक्री करण्यासाठी घेऊन येत आहेत, अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने शेंडी बायपास चौकात सापळा लावून नगरच्या दिशेने दुचाकीवरून येणार्या दोन तरूणांना थांबविले. पथकाने एकाला पकडले तर दुचाकी चालक तरूण पसार झाला.
पकडलेल्या तरूणाने त्याचे नाव अभय काळे असे सांगितले. त्याच्या झडतीत दोन गावठी कट्टे व सहा काडतुसे मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्याच्या सोबतचा तरूण विवेक शिंदे पसार झाला आहे. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.