Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विक्रमसिंह पाचपुते हे महायुतीचे उमेदवार म्हणून विजयी झाले. विक्रमसिंह पाचपुते यांच्या बाबतीत जर आपण बघितले तर ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.
आपल्याला माहित आहे की, या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी विक्रम सिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळण्यावरून बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. अगोदर भाजपाच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्री प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी त्यांच्या ऐवजी त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी थेट मुंबई गाठून देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.
तरी देखील भाजपाच्या माध्यमातून प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली होती. परंतु अर्ज माघारीच्या अगदी शेवटच्या क्षणी विक्रमसिंह पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व निवडणुकीच्या रिंगणात उतरले व विजयी देखील झाले.
आता ते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार असून साहजिकच आता त्यांच्यावर श्रीगोंदा मतदार संघातील असलेल्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी असणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर नुकतीच एका प्रसिद्ध माध्यमाने विक्रम सिंह पाचपुते यांची मुलाखत घेतली व त्यावेळी त्यांनी निवडणुकीतील प्लॅनिंग तसेच श्रीगोंदा मतदारसंघातील महत्त्वाचा असलेला शेतीचा पाणी प्रश्न इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.
श्रीगोंद्याचा पाणी प्रश्न कसा सुटणार? आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी स्पष्टच सांगितले
यावेळी त्यांना श्रीगोंदाच्या पाणी प्रश्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की श्रीगोंदा तालुक्यातील जो काही प्रश्न आहे तो मानवनिर्मित आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे श्रीगोंदा तालुका हा पर्जन्यछायेत येत असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच पुरेसा पाऊस होत नाही व कायमच पाणी प्रश्न हा निर्माण होत असतो.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, कुणीही निवडून आले किंवा कोणत्याही नेत्याने सांगितले की मी श्रीगोंदा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवणार तर हे शक्य नाही. परंतु यापुढे बोलताना त्यांनी म्हटले की, दरवर्षी मात्र काही पातळीवर काम करून हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले की, तालुक्यातील घोड तसेच कुकडीचे आवर्तन वेळेवर मिळाल्यास प्रामुख्याने शेतीसाठी पाण्याची अडचण येत नाही. परंतु धरणांमध्ये जर पुरेसे पाणी नसेल तर मात्र पाण्याचे नियोजन बिघडते व हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होते. साहजिकच या सगळ्या नुकसानीचे खापर हे लोकप्रतिनिधीवर फोडले जाते.
त्यामुळे घोड आणि कुकडीतून सुटणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचा जो काही प्रश्न आहे तो योग्य पद्धतीने नियोजन करून सोडवणे खूप गरजेचे आहे व त्यावरच माझा आता भर राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.तसेच विरोधकांच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीत साकळाईचा मुद्दा उपस्थित केला गेला.
यामध्ये कृती समितीकडून ओव्हरफ्लोच्या पाण्याचे मागणी केली जात आहे. वास्तविक ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपल्याकडील तलावामध्ये पाणी असते व त्यामुळे हे ओव्हरफ्लोचे पाणी उचलून टाकणार कुठे असा प्रश्न निर्माण होतो.
याबाबतीत सर्वेक्षण करण्यात आले असून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत व त्यात आता सुधारणा करण्याचे काम सुरू असून साकळाईचा पाणी प्रश्न देखील योग्य पद्धतीने सोडवण्यावर माझा भर राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
तसेच घोड, कुकडी, 123 चारी, तेरा नंबर चारी यांच्या अस्तरीकरणाच्या निविदा निघाल्या असून आचारसंहिता संपल्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता मतदारसंघातील शेतकऱ्यांना फायदा होऊन पाणी गळती थांबून आवर्तन वेळेवर मिळण्यास मदत होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
आमदार झाल्यानंतर आता प्रथम प्राधान्य हे रस्ते तसेच वीज, पाणी व बेरोजगारी या प्रश्नांना
तसेच बोलताना आमदार विक्रम सिंह पाचपुते यांनी म्हटले की, आता माझे प्राधान्य रस्ते तसेच वीज, बेरोजगारी व पाणी या सारखे महत्त्वाच्या प्रश्नांना राहणार असून त्या दृष्टीने याचा विजन तयार करण्यात आले आहे. श्रीगोंदे एमआयडीसी करिता शेती महामंडळाचे 622 एकर क्षेत्र एमआयडीसीला मिळाले आहे.
यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ.सुजय विखे पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचे देखील त्यांनी म्हटले. एमआयडीसी झाल्याने या ठिकाणी नवीन उद्योग येणार व बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. एमआयडीसीचे प्रकरण आता हाय पावर कमिटीकडे असून यास मंजुरी मिळाल्याने एमआयडीसीला आता प्रत्यक्षात मूर्त रूप येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
दादांची शिदोरी कायम माझ्या पाठीशी-आ. विक्रम सिंह पाचपुते
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, साधारणपणे 2009 पासून या मतदारसंघांमध्ये मी काम करत आहे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून आमदार बबनराव पाचपुते यांचा प्रतिनिधी म्हणून श्रीगोंदा मतदारसंघात काम करत असल्यामुळे दादांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली व त्यातून जनतेचे प्रश्न सोडवण्यास मदत झाली.
दादांचे मला कायम मार्गदर्शन असते व त्यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी मला कायम उपलब्ध असल्यामुळे येणाऱ्या भविष्यात जर काही अडचणी आल्या तर त्या सोडवणे मला सोपे झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.
दादा आजारी असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आणि दादा 45 वर्षे आमदार असल्यामुळे त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे.
गेल्या अडीच ते तीन वर्षापासून मतदार संघासह मंत्रालयात जाऊन विविध कामांचा पाठपुरावा मी केला व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासह मतदारसंघातील अनेक कामे मंजूर करून आणली.
आता मी आमदार झाल्यानंतर बबन दादा यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी माझ्यासोबत असल्याने मला काम करताना काहीच अडचण येणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.