अहमदनगर बातम्या

कुकडी आवर्तनाचे पाणी सीना धरणात पोहचले !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगड या कायम जिरायती भाग म्हणून ओळख असलेल्या या भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणाने यंदा पाण्याची पातळी गाठली आहे. या भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत.

तर या धरणावर अवलंबून असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मागांवर असल्याचे चित्र निर्माण झाल्याने अखेर कुकडी ओव्हरफ्लो आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे सीना धरणात ४३५ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.

आज दि.५ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान कुकडीचे पाणी सीना धरणात पोहोचले. कुकडीचे पाणी सीना धरणात मिळावे, या मागणीचा येथील जनतेतून रेटा होत होता. येथील बिकट होत चाललेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सीना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

४३५ क्युसेसने सोडण्यात आलेले हे पाणी सध्याची स्थिती व धरणातील उपयुक्त साठा पाहता जास्तीत जास्त दिवस सोडून सिना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होईल, याचा विचार करून देण्यात यावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

कुकडी आवर्तनातून पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. या भागात पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले असतानादेखील अद्यापही म्हणावा असा पाऊस न झाल्याने धरण पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक झालेली नाही.

सिना धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा काही अंशी प्रश्न सुटेल. मात्र आवर्तन जास्त दिवस राहिल्यास शेती सिंचनाचा प्रश्नदेखील सुटेल, अशा अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आहेत.

सीना लाभक्षेत्रातील सध्याची स्थिती पाहता कुकडी कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत सिना धरणात भोसा खिंडीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने ४३५ क्युसेस पाण्याचा प्रवाह सुरू असून आज दि. ५ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान भोसा खिंडीतून पाणी सिना धरणात पोहोचले आहे.

Ahmednagarlive24 Office