Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकी येथे अप्पासाहेब महादेव लांडगे (रा. बाबुर्डी घुमट ) या इसमाचा किरकोळ कारणावरून खून झाल्याची घटना घडली. २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, चौघांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात भादविकच्या ३०२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अरुण पिराजी बोठे, प्रविण उर्फ पंकज अरुण बोठे, मनोज राधाकिसन भालसिंग व इंदुबाई अरुण बोठे असे गुन्हा दाखल झालेल्या चौघा आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बाबुर्डी घुमट येथील अप्पासाहेब महादेव लांडगे (वय ४५) हे वाळकी येथील साई कलेक्शन दुकानात काम करून घराकडे निघाले होते.
वाळकी शाळेजवळ एका महिलेला त्यांच्या गाडीचा धक्का बसला. या कारणावरून अरुण बोठे, प्रविण बोठे, मनोज भालसिंग व इंदुबाई बोठे यांनी अप्पासाहेब लांडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
या घटनेत अप्पासाहेब लांडगे यांचा मृत्यू झाला. ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत अप्पासाहेब लांडगे यांच्या पत्नी अलका लांडगे यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. २३) नगर तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. चव्हाण हे करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे वाळकी परिसरात खळबळ उडाली आहे.