Ahmednagar News : राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहे. तर इतर महत्त्वाच्या मुद्यांना बगल देण्यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये धर्माच्या नावाखाली लढविले जात असल्याचा आरोप बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. तर विविध जातींचा मागासलेपणाची चिकित्सा करण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्दयावरुन जाती-जातीमध्ये सुरु असलेले भांडणे, हिंदू मुस्लिमांमध्ये धर्माच्या नावाखाली पसरत चाललेला द्वेष, जातनिहाय जनगणना आदी मुद्दयांवर समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वामन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निघालेल्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मेश्राम शहरात आले असता, जुने बसस्थानक येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मेश्राम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पुढे मेश्राम म्हणाले की, जातीनिहाय जनगणना विकासासाठी आवश्यक आहे. देशात जीतीनिहाय जनगणना झाली, तर कोणत्या समाजाचा किती विकास झाला आणि कोणता समाज मागासलेला आहे? याचे अभ्यासात्मक आकडेवारी बाहेर येणार आहे.
यातून देशाच्या विकासासाठी ध्येय धोरण ठरविता येणार आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून बहुजनांच्या मतांचे मूल्य शून्य केले जात असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. एससी, एसटीला क्रिमिलियरची घातकपणे टाकलेली अट म्हणजे त्यांना आरक्षणापासून दूर करण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. भास्कर रणनवरे म्हणाले की, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे. नवोदित कलाकारांना काम देऊन त्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. देशात जाणीवपूर्वक महापुरुषांची बदनामी व खोटा इतिहास पुढे आणण्याचे कटकारस्थान सुरू आहे.
आरक्षणाच्या मुद्यांना बगल देण्यासाठी धार्मिक द्वेष पसरविला जात आहे. या विरोधात सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब काळे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्दयावरुन समाजात दुही पसरली आहे. याचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजण्याचे काम सत्ताधारी करत आहे. सत्ताधाऱ्यांची राजकीय जुमलेबाजी हाणून पाडण्यासाठी ही यात्रा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.