अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच होते.
दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी आरोग्य संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर डॉ. रामटेके यांनी लेखी आश्वासन दिले.
परंतु, यावर डॉक्टर, परिचारिकांचे समाधान न झाल्याने आम्ही काम बंद आंदोलनावर ठाम असल्याचे महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला आग लागून यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. यानंतर सरकारने चौकशी समिती नियुक्त केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना दोषी धरून त्यांना गुन्ह्यात वर्ग करून घेतले. यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
नेमक्या मागण्या काय आहेत ?
जिल्हा रुग्णालयात तातडीने आग सुरक्षा यंत्रणा बसविण्यात यावी किंवा ही यंत्रणा जोपर्यंत बसविण्यात येत नाही तोपर्यंत आम्हा डॉक्टर, कर्मचार्यांना झालेल्या दुर्घटनेस जबाबदार धरण्यात येऊ नये, असे लेखी आश्वासन डॉक्टर, परिचारिकांना पाहिजे आहे.