अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली असून याबरोबरच मानवातील क्रूरता देखील वाढू लागली आहे. किरकोळ कारणातून एकमेकांच्या जीव घेणे अशा धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडू लागल्या आहेत.
नुकतेच शुल्लक कारणावरून एकास जीवे मारल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.
स्वयंपाक करत नाही या क्षुल्लक कारणावरून भंगार दुकानातील कामगाराचा खून करण्यात आला. केडगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळील लक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकानातही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांना एकाला अटक केली असून महेश शिवराम निसाद (वय 29, रा. चिल्ला, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून बाबादिन झंडू निसाद (वय39, रा चिल्ला, उत्तर प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी दुकानाचे मालक अशोक रामस्वरूप निसाद यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी महेश निसाद विरोधात खुनाचा गुन्ह दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, उत्तर प्रदेशातील चिल्ला तालुक्यातील चकला गावचे अशोक निसाद यांचे निंबळक-केडगाव बायपास रोडवरील उड्डाणपुलालगत लक्ष्मी स्क्रॅप मर्चंट नावाचे भंगार दुकान आहे.
नवीन टिळक रोडवरील संतोष कानडे यांच्याकडे ते भाडोत्री म्हणून राहतात. त्यांच्या दुकानात महेश निसाद व बाबादिन निसाद हे दोन कामगार आहेत. स्वयंपाक करत नाही या क्षुल्लक कारणावरून महेश याने बाबादिन याच्याशी वाद घातला. या वादात महेश याने दुकानातील लोखंडी गजाने बाबादिनच्या हाता-पायावर मारले.
या मारहाणीतच बाबादिनचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. त्यानंतर तेथे असलेल्या महेश निसाद याला ताब्यात घेतले. मालक अशोक निसाद यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.