अहमदनगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर देवस्थान हे जगभर प्रसिद्ध आहे. येथे विविध कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या हे देवस्थान आणखी काही कारणांनी चर्चेत आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रस्टची चौकशी होईल अशी घोषणा केली होती. आता देवस्थानचे कामगार विश्वस्थांविरोधात आक्रमक झाले आहेत.
हे कर्मचारी हक्क आणि मागण्यांसाठी उद्यापासून अर्थात सोमवारपासून (ता. 25) संपावर जाणार आहेत. विशेष म्हणजे या गोष्टीत जिल्हा प्रशासनाने कामगारांसाठी मध्यस्थी करावी अशी कामगारांची इच्छा असून यासाठी संपकाळात कर्मचारी हे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या निवासस्थानी ‘मध्यस्थी विनंती महामुक्काम’ करणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना याबाबत कामगार संघटना महासंघ आणि सिटूने निवेदन दिलं आहे.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
श्री क्षेत्र शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थान कामगार युनियन (सीआयटीयू संलग्न) संघटनेचे सर्व सभासद 25 वर्षांपासून कामगार म्हणून येथे काम करत असून हे सर्व कामगार नियमित आहेत. कामगारांच्या कायदेशीर हक्क आणि मागण्यांकडे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी व विश्वस्तांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
1 ऑक्टोबर 2003 मध्ये यापूर्वीचा करारनामा झालेला असून यावेळी समेट अधिकारी म्हणून तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त ए. ह. फुफाटे यांनी सकारात्मक भूमिका बजावली होती. महिला कर्मचाऱ्यांची ट्रस्ट अक्षरशः श्रमचोरी करत आहे की काय असे वाटत असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या पीएफची देखील काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे म्हटले आहे. धक्कादायक बाब अशी की, येथे कसलीही नुकसान भरपाई दिली जात नसून कोरोना काळातील 18 महिन्यांचा राहिलेला अर्धा पगार देखील दिला नाही.
यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी कामगारांनी केली असून 2003 मध्ये केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसून देवस्थानकडून कायद्याला फाटा दिला जात असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता कामगार संघटनांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले असून संपकाळात जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी म्हणून भूमिका निभवावी अशी मागणी कामगारांकडून होत आहे.