अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
बिबट्याच्या हल्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर काहींना बिबट्याने गंभीर जखमी केले आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नीरज पुजारी हे नेहमीप्रमाणे पहाटे व्यायामासाठी फिरत असताना मांगिरबाबा परिसरातील संजय गायकवाड यांच्या वस्ती समोर त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला.
नीरज पुजारी हे सावध असल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. त्यांच्यासह मागेपुढे फिरण्यास आलेले नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या तिथून पसार झाला.
विशेष म्हणजे बिबट्याने नीरज पुजारी यांचेवर समोरुन हल्ला केला. त्यामुळे त्यांना त्वरित प्रतिकार करता आला. त्यांच्या शरीरावरती बिबट्याच्या नखांचे निशाण झाले असून त्यांची तब्येत व्यवस्थित आहे.
बेलापूर खुर्द गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून वन अधिकाऱ्यांनी या भागात त्वरित बिबट्या धरण्यासाठी पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांमधून जोरदार मागणी होत आहे.