Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तरुणाने सातवीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित मुलीला शुक्रवारी (दि.५) मध्यरात्री अंबरनाथ येथून ताब्यात घेतले असून,
मुलीला पळवणारा रोहित संजय राक्षे (रा. तिसगाव) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित मुलीची मेडिकल करून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तिसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेण्याच्या सातत्याने घडत आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलींना फुस लावून पळवणाऱ्या आरोपींवर पोस्को अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पालकांमधून करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस कर्मचारी ईश्वर बेरड, पालवे, बडे, बुधवंत यांनी संबंधित आरोपीला २४ तासांत बेड्या ठोकल्या.
सातवीपासून दहावी बारावीतील काही मुलं-मुली वर्गातच चुकीचे वागतात; परंतु त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे मुली घरी आल्यावर आम्हाला घडलेला प्रकार सांगतात. त्यामुळे तिसगावमधील शैक्षणिक वातावरण गढूळ झाले आहे,
त्यामुळे पुढीलवर्षी मुलीला दुसऱ्या शाळेत दाखल करणार असल्याचे मत एका पालकाने व्यक्त केले आहे.