अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-एक वीस वर्षीय तरुण मोबाईल खरेदीसाठी गेला आणि त्याला पोलिसांनी थेट तुरुंगात टाकले आहे. त्यास कारण असे कि खरेदी करण्यात येणार मोबाईल हा एका चोरीच्या गुन्ह्यातील होता.
दरम्यान मोबाइल विकत घेणारा करण सोमनाथ रोकडे (वय- 20 रा. शिवनगर झोपडपट्टी आडगाव ता. जि. नाशिक) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथुन अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 11 नोव्हेंबरला संजय संभाजी पाठक (रा. घाटशिरस ता. पाथर्डी) शहापूर (ता. नगर) येथे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून लघुशंका करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्यांना जखमी करून त्यांची दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्ह्यातील चोरीचा मोबाईल नाशिक येथील करण रोकडे याच्याकडे असल्याची माहिती समोर आली.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी एक पथक तयार करून नाशिक येथे पाठविले. करण याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यातील मोबाईल विकत घेतल्याची कबूली दिली.
पोलिसांनी मोबाईल जप्त करून त्याला अटक केली. करण रोकडे याने जॉन चलन पडेची (रा. देवळाली कॅम्प, नाशिक), साहिल सुरेश म्हस्के ऊर्फ मोन्या, हर्ष सुरेश म्हस्के (दोघे रा. मच्छीमार्केट, नाशिक) यांच्याकडून मोबाईल विकत घेतल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.
वरील आरोपी नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून, दरोडाच्या गुन्ह्यात नाशिक सेंट्रल जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.