७ जानेवारी २०२५ कुळधरण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा प्रसिद्ध आहे. या कथेतील नायक स्मशानातील राख उकरून त्यातील सोनं काढून त्याची विक्री करत असतो.अगदी असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरातील एका गावात सोमवारी (दि.६) उघडकीस आला.
स्मशानभूमीतील अस्थिराखेची सोन्यासाठी चोरी झाल्याची घटना या गावात घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेत चोरट्यांनी महिलेने परिधान केलेल्या अलंकारिक भागाच्याच अस्थिराखेची चोरी केली. सोमवारी सकाळी नातेवाईक सावडण्याच्या विधीसाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
दरम्यान, या चोरट्यांनी जवळ असलेल्या ओढ्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात या राखेतून सोने काढल्याचे स्पष्ट झाले आहे.शनिवारी येथील एका गावात मध्यमवर्गीय कुटुंबातील वृद्ध महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.अंत्यविधी रविवारी सकाळी ठेवण्यात आला होता.
परंतु, काही अडचणींमुळे हा विधी शनिवारी मध्यरात्री करण्यात आला.त्यामुळे सावडण्याचा विधी सोमवारी (दि. ६) ठेवला होता.यासाठी सकाळी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, ग्रामस्थ जमा झाले.जेव्हा स्मशानात हे सर्व एकत्र आले.तेव्हा मृताच्या अस्थिराखेची चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर गावातील तरुणांनी लगतच ओढ्यावरील बंधाऱ्यातील पाण्यात पाहणी केली असता येथेच चोरट्यांनी राख चाळणी केल्याचे लक्षात आले. दरम्यान या घटनेनंतर गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तत्काळ चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.