अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करून ती योग्य पद्धतीने पूर्णत्वास नेण्याचे काम करून घ्यायची जबाबदारी असलेल्या
निसर्ग कन्सल्टन्सी या संस्थेला आधीच्या सत्ताधारी गटाने कामाबद्दल कुठल्याही सूचना-नोटीस न देता हाकलून लावले, तसा ठरावही करून घेतला.
त्या कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे हे जुने सत्ताधाऱ्यांनीच सांगावे, असा प्रश्न नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला.
वहाडणे म्हणाले, नियमबाह्य पद्धतीने काम काढून घेतल्याने व केलेल्या कामाचे बिलही अदा न केल्याने त्या कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायालयात जर त्या कंपनीच्या बाजूने निकाल लागला, तर कोपरगाव नगरपरिषदेस एक ते दीड कोटी रुपयांचा भुर्दंड पडू शकतो.
कारण त्या कंपनीने केलेल्या कामाचे बिल व्याजासह मिळण्यासाठी दावा दाखल केलेला आहे. जनतेच्या कर भरण्यांमधून हे पैसे देणे म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या खिशाला बसणार आहे.