शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील आरोग्य उपकेंद्रावर परिसरातील चार ते पाच गावांचा आरोग्याचा भार आहे. परंतु उपकेंद्राला अनेक समस्यांचा विळखा पडला असून, हे उपकेंद्रात निवासी पद रिक्त असल्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था असूनही येथे वर्षापासून कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे.
दहिगावने आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील शहरटाकळी मोठे गाव असून, लहान मोठी सात गावे या गावाशी जोडलेली आहेत. त्यापैकी चार गावे प्राथमिक उपकेंद्रात येतात. येथे शासनाने आरोग्य केंद्राची नवीन इमारत, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, या सुविधा दिलेल्या आहेत;
परंतु वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी मुख्यालयापासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावरील तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. कोणीही मुख्यालयी राहत नसल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. शिवाय येथे रात्रीच्या वेळी येणाऱ्यांना दुसरीकडे रेपर केले जाते.
सायंकाळी किंवा रात्री एखादी दुर्घटना घडल्यानंतर रुग्णाला उपकेंद्रात आणले असता, तेथे कोणीच राहत नसल्यामुळे रुग्णाला उपचारासाठी शेवगाव येथे जावे लागते. येथील आरोग्य उपकेंद्र एकाच कर्मचाऱ्यावर चालत आहे.
येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची गेल्या वर्षभरापासून बदली झाल्यापासून या जागेवर अद्यापपर्यंत येथे नव्याने कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, यासाठी अनेक तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही.
येथे परिसरातील रुग्ण उपचारासाठी रोज आरोग्य उपकेंद्रात येतात; परंतू या ठिकाणी निवासी कर्मचारी वर्ग नसल्यामुळे व वेळेवर आरोग्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे येथील प्राथमिक उपकेंद्राला पूर्ण कर्मचारी मिळण्याची मागणी उपसरपंच सविता खंडागळे यांनी केली आहे.
शहरटाकळी येथील आरोग्य केंद्राचा भार एकच कर्मचाऱ्यावर आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. परिसरातील चार ते पाच गावांतील रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथे कर्मचाऱ्यांची एक वर्षापासून नियुक्ती केली जात नाही – राजेंद्र खंडागळे, शहरटाकळी