अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- निघोज येथील रहिवासी असलेला हा तरूण ३ मे रोजी मुंबईहून सासुरवाडी पिंपरी जलसेन येथे पत्नी व दोन मुलांसह आला होता. प्रशासनाने संपूर्ण कुटुंब जि. प. शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले.
तरूणास काही दिवसांनंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला. परंतु विलगीकरण कक्षाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा तरूण निघोज येथे डॉक्टर असलेल्या भावाकडे एकटाच गेला.
लक्षणे संशयास्पद आढळल्याने त्या डॉक्टरने तरूणास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. निघोज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्मिता म्हस्के यांनी त्यास नगर येथे जिल्हा रूग्णालयात जाण्यास सांगितले.
त्यांनीच १०८ रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने तरूणाने स्वतः नगर येथे जाऊन उपचार घेतो, असे सांगत तो पुन्हा पिंपरी जलसेन येथे आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास झाल्याने प्रशासनाशी संपर्क साधून त्यास नगरला नेण्यात येत होते.
मात्र, प्रवासात त्याचा मृत्यू झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले. डॉ. लाळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ रोजी तरूणासह कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
लक्षणे आढळून न आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या तरूणाचा मृत्यू झाल्यामुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून निघोज, पिंप्रीजलसेनसह परिसरात भितीचे वातावरण आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com