Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेचा कारभार हा सभासद, सर्वसामान्य शेतकरी व बँकेचे हित पाहूनच केला जात असून, बँकेच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात विकास साध्य केला जातो. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे. बँकेला यशाची मोठी परंपरा आहे, ही वस्तुस्थिती असतानाही विरोधक केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करतात.
त्यांच्या आरोपात कुठल्याही प्रकारची तथ्य नसून, ते आरोप केवळ राजकिय आकसापोटीच आहेत, अशी रोखठोक प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे चेअरमन, माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली.
राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा बँकेत मनमानी कारभार चालू आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची वाहने खरेदी केली, असा आरोप केला होता. या आरोपास श्री. कर्डिले यांनी सडेतोड भाषेत उत्तर दिले.
जिल्हा बँक संचालकांच्या परदेशी दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, संचालकांचा परदेशी दौरा हा बँकेच्या कारभाराचाच एक भाग आहे. यापूर्वीही संचालक मंडळ परदेशी दौऱ्यावर गेले होते. आता ऑक्टोबर महिन्यात संचालक मंडळ परदेशी दौऱ्यावर जाणार असून, दौऱ्यात ५ देशांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, नगर तालुका खरेदी विक्री संघाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील. संघाला उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे, यासाठी जागा उपलब्ध करून तेथे पेट्रोल पंप सुरु करण्याचा मानस आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील येथील जागेत भुसार माल तसेच नेप्ती उपबाजार समितीचेही उर्वरित कामकाज लवकरच सुरु करण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऑनलाईन कारभार सुरु झाल्याने व्यवहारात पारदर्शीपणा आल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील सध्याच्या राजकिय स्थितीवर त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. भाजपअंतर्गत कोठेही धुसफूस नसून, राज्यात आणि देशात भाजपला पोषक वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला.