Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती संपता संपत नसून, चांदबिबी महालापासून स्टेट बँक चौकापर्यंत वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून टाकळी फाटा ते नगरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झाले.

मात्र, तिसगावजवळील निंबोडी फाट्यापासून देवराईपर्यंतचा रस्ता बऱ्याच अंशी खराब झाला असून, त्याचा निधी प्रलंबित आहे कवडगावपासून भातोडी फाट्यापर्यंत रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्याची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
खराब रस्त्यामुळे नियम बाजूला ठेवून काही वाहनचालक खड्डे चुकवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने गाड्या चालवतात. यामुळे लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. टोलनाक्याचे काम चालू असलेल्या ठिकाणीही ये-जा करण्यासाठीचा रस्ता खड्डेमय झाला असून, त्यात साधा मुरूम टाकण्याचेही सौजन्य ठेकेदारांकडून दाखवले जात नाही.
पाथर्डी शहरातही महामार्गाच्या बाजूला भर चौकात रस्ता वाहतूक योग्य राहिलेला नाही. रस्त्याची एक बाजू बऱ्याच प्रमाणात अतिक्रमणांमध्ये गेली आहे. दुकानापुढे वाहने लागून मोठ्या अवजड वाहनांना रस्त्यावरून गाडी काढता येत नाही.
पाथर्डी शहरातही अजंठा चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरेल, अशा टपऱ्या नव्याने झाल्या असून, गावातून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरचे वाहने नीट दिसत नाही.
या रस्त्यावरून रुग्णवाहिकांसह शासकीय गाड्या दिवसातून अनेक वेळा जातात, मात्र टपरीचालकांना वाहतुकीसाठी अडथळा ठरू नका, असे सांगण्याचे धाडस पोलिस, पालिका प्रशासन अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग करीत नाही.
याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. राष्ट्रीय महामार्गावर आंबेडकर चौकातील परिस्थिती, तर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनले असून, वारंवार वाहतूक कोंडी तेथे होते. नगर-पाथर्डी-टाकळी फाटा या रस्त्यावरील खड्डे व पुलावरील जोडाची कामे त्वरित करण्याची मागणी होत आहे.