मोठे युद्ध व्हईल, राजा गादी सोडून पळून जाईल..शेळ्या, मेंढ्या चक्कर येऊन पडतील.. अहमदनगर मधील या प्रसिद्ध देवस्थानचे भाकीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : महाराष्ट्रात काही ठराविक देवस्थाने अशी आहेत की जेथे व्हईक वर्तवण्यात येते. व्हईक म्हणजे तेथील पुजारी आगामी वर्ष कसे असेल यांचा अंदाज वर्तवतात. या परंपरेस शेकडो वर्षांची परंपरा असते व त्यानुसार खरोखर तसेच घडते अशी भाविकांची श्रद्धाही आहे.

असेच व्हईक नेवासे तालुक्याचे सीमेवर असलेल्या पांढरीपूल व खोसपुरी येथे असलेल्या बाबीर देवस्थानमध्ये वर्तवण्यात येत असते. हे ऐकण्यासाठी शेकडो लोक गर्दी करतात.

सालाबादप्रमाणे या वर्षीही २०२४ कसे असणार याबाबत भाकीत वर्तवण्यात आले. देशादेशात मोठ युद्ध भडकणार आणि राजा गादी सोडून पळून जाणार अशा खळबळजनक भाकितासोबत इतरही भाकीत वर्तवण्यात आले. बाबीर देवस्थानचे मुख्य पुजारी बंडूभाऊ पिसाळ यांनी हे व्हईक केले.

काय वर्तवले भाकीत ?

यावर्षी धनधान्य मुबलक ज्वारी, गहू भरपूर होईल. मात्र, हरभरा पहावयास मिळणार नाही. गाय वासरांना मोल मिळेल आणि नंदी तोळ्याच्या भावात विकला जाईल असे म्हटले आहे. चालू वर्षी रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. जेमतेम पाऊस झाला असला तरी गहू,

ज्वारी बरकत देईल. मात्र, हरभरा पहावयास मिळणार नाही. येणारा पावसाळा जेमतेम राहील, हस्त नक्षत्रात हत्तीची सोंड जिकडे फिरेल, तिकडे घो धो पाऊस होईल असे पावसाबाबत भाकीत केले आहे. धुराडीत अंगावर गुलाल रंग उडेल. मात्र गुढी उभारायाला संकट येईल.

सुगडे पुजलेले जागेवर राहतील. शेळ्या, मेंढ्या चक्कर येऊन पडतील आणि अकरा वर्षांच्या आतील बालकांना आरोग्याच्या पीडा निर्माण होतील. सध्या देशादेशांमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे. देशातदेशात भयंकर युद्ध भडकेल आणि राजा गादी सोडून पळून जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे परंपरा ?

बाबीर देवस्थानचा उत्सव दरवर्षी दिवाळीनंतर पार पडला जातो. बाबीर देवस्थानच्या दीपावली सणाच्या यात्रा उत्सवात हे व्हईक पार पडते. आगामी वर्षाबाबत यामध्ये भाकीत केले जाते. येणाऱ्या वर्षात चांगल्या वाईट घटनांचे भाकीत बाबीर देवस्थानचे मुख्य पुजारी बंडूभाऊ पिसाळ यांच्याकडून वर्तवण्यात येते.

यंदाही हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. मंदिराचे पुजारी बंडूभाऊ पिसाळ यांनी यांना संपूर्ण अंगाला भंडारा लावून घोंगडी टाकून काठीने अंगावर वार झेलत व्हईक सादर केले. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.