पाण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्याचे जलसंपदामंत्रीच पाण्याच्या बाबतीत विविध वक्तव्ये करून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण करीत आहेत; मात्र सरकारमध्ये बसलेले जिल्ह्यातील तीन मंत्री समन्यायी पाणीवाटप कायद्यात बदल करून घेण्याबाबत पुढाकार का घेत नाहीत?

असा सवाल भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायद्याची लढाई पुन्हा सुरू करणार असून, पाण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्ना संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडून पाण्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे; परंतु जिल्ह्यातील कुठलाही नेता यावर बोलायला तयार नाही.

समन्यायी पाणीवाटप कायदा मंजुर होत असतानाही अनेकजण गप्प बसुन राहिले. सत्ता गेल्यानंतर एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही, अशा वल्गना करीत होते. आता सत्तेत गेल्यानंतर या विषयासंदर्भात त्यांनी पुन्हा गप्प बसण्याची भूमिका घेतली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मंत्री आहेत.

त्यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्यामध्ये बदल करून घेण्याबाबतचे दायित्व पूर्ण करायला हवे होते; परंतु स्वत:ला मोठे समजणारे नेते मात्र जिल्ह्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत काहीच करताना दिसत नाहीत, अशी टिकाही आमदार विखे पाटील यांनी केली.

कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबतचा पाणी परिषदेचा प्रस्ताव भाजप सरकारने स्विकारुन त्याची अंमलबजावणीही सुरु केली होती.

याबाबत तयार केलेल्या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणे हाच यावर उपाय आहे; मात्र महाविकास आघाडी सरकारची याबाबतीत उदासिनताच दिसत असल्याचे आमदार विखे पाटील म्हणाले.