अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- बंधाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा याच बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, माळेवाडी येथे शेतमजूर म्हणून काम करणारे मंजाबापू भागवत गायकवाड व चंद्रकला मंजाबापू गायकवाड हे दोघे पाऊस पडल्यामुळे, शेतात काही काम नव्हते, त्यामुळे बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते.
त्यांच्या समवेत त्यांचे पुतणे व सून हे देखील होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चंद्रकला यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात पडल्या.
त्यांना वाचविण्यासाठी मंजाबापू यांनी पाण्यात उडी मारली; परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दोघेही वाहून गेले. ही घटना त्यांचे पुतणे व सून यांनी पाहिली.
त्यांच्या आवाजाने इतर नागरिकांनी लगेच पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; यात चंद्रकला यांना बाहेर काढण्यात यश आले; परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
तर मंजाबापू यांना शोधण्याचे प्रयत्न रात्रीपर्यंत सुरू होते. हा ओढा श्रीरामपूर येथून सुरू होतो व माळेवाडीतून सरालामार्गे सराला येथे गोदावरी नदीला मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असते.