अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग स्वत:च हटवण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी नेहरू पुतळा परिसरातील चार पैकी तीन अनधिकृत फलक हटवले.
उर्वरित एक फलक मंगळवारी हटवण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीने काही दिवसांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात आंदोलन करण्यात आले होते.
नेहरू पुतळा परिसरातील होर्डिंग हटवावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. त्यावर मनपाने होर्डिंग हटवण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र कारवाई न झाल्यामुळे 12 जानेवारीला बुलडोजरने होर्डिंग्ज हटविण्याची घोषणा केली होती. काँग्रेस पक्षाच्या या आक्रमक घोषणेमुळे शहरात तणाव निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतु त्यापूर्वीच जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यामुळे मनपाने कारवाई करत सर्व होर्डिंग्ज उतरवले. त्याचबरोबर नेहरू पुतळा परिसराला लागून असणारी अतिक्रमणे देखील हटविली.