२३ जानेवारी २०२५ राहुरी शहर : एक महिन्यापूर्वी शहरातील शिवाजी चौक येथील नागपाल यांच्या कापड दुकान समोरील ओट्यावरुन रेडिमेड कपड्यांचा बॉक्स चोरुन नेल्याची घटना घडली होती.सदर गुन्ह्यातील आरोपीला राहुरी पोलीस पथकाने ठाणे जिल्ह्यातून नुकतीच अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहूरी शहरातील शिवाजी चौक परिसरात सुधीर हरजीत नागपाल यांचे राजेश गारमेंट नावाचे रेडीमेड कापडाचे दुकान आहे. (दि. २४) डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान नागपाल यांच्या दुकानात ७५ हजार रुपये किंमतीचे रेडीमेड कपड्यांचा बॉक्स आला होता.
तेव्हा नागपाल यांनी तो बॉक्स दुकानाच्या ओट्यावर ठेवला होता.तेव्हा एक चोरटा तेथे आला आणि कपड्याच्या बॉक्स जवळच बसला.त्याच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून त्या चोरट्याने सदर कपड्याचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असलेल्या एका रिक्षात नेऊन ठेवला आणि तो देखील रिक्षात बसून तो शिवाजी चौक ते शनिचौक मार्गे पसार झाला होता.
याप्रकरणी सुधीर हरजीत नागपाल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, सतिष कुऱ्हाडे, सचिन ताजने, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने सदर गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, आरोपीचा सुगावा लागताच पोलीस पथकाने ठाणे येथील अंबरनाथ येथे जाऊन आरोपी रवी राजू अरकेरी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सदर आरोपी रवी राजू अरकेरी याला जेरबंद करण्यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मुद्देमाल जप्त करण्याचे काम पोलीस पथकाकडून सुरु आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते व हवालदार संदिप ठाणगे हे करीत आहे.
याबाबत चोरीचा तपास आठ दिवस होऊनही न लागल्याने शहरातील व्यापारी वर्ग पोलीस स्टेशन येथे गेले व त्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेऊन या तपासास गती द्यावी, लवकरात लवकर तपास लावण्याची मागणी केली.
या मागणीवरून पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी दखल घेवून पथके तपास करण्यास पाठवून सदर आरोपीस ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केल्याने व्यापारी संघटनेचे पोलीस निरीक्षक व पोलिसांचे आभार मानले.