अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नुकतेच शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील पान टपरी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहमद कासम तांबोळी (वय 51, रा. प्रेमदान हडको, अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील व्ही स्टार हॉटेलजवळ व्ही राज पान स्टॉल नावाची पान टपरी आहे. 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चार चोरट्यांनी ही टपरी फोडून चोरी केली.
चोरट्यांनी टपरीच्या मागील दरवाज्याचा कडी कोयंडा उचकाटून आत प्रवेश करून 5 हजार 300 रूपयांचा माल चोरून नेला. यामध्ये पाच हजार रूपयांची सिगरेट व 300 रूपयांच्या पान मसाल्याचा समावेश आहे.
तांबोळी यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार शेख हे करत आहेत.