Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा परिसरात चोर आल्याची माहिती ग्रामसूरक्षा यंत्रणेमार्फत चोर समजताच त्याला तात्काळ प्रतिसाद देत पिंपळगाव पिसाचे पोलिस पाटील सुनील शिवणकर यांनी पोलिस मित्रांच्या बरोबर गावात गस्त सुरु करून चोरट्यांचा पाठलाग केला.
मात्र अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी दरोड्याचे साहित्य आणि दुचाकी उसाच्या कडेला टाकून देत अंधाराचा फायदा घेत पलायन केल्याने दरोड्याचा प्रकार टळला. या कामगिरीबाबत पोलीस पाटील शिवणकर यांना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सन्मानित केले.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. २६ जुलै रोजी रात्री खरातवाडी शिवारात चोरटे आल्याची माहिती रात्रीच्या गस्तीदरम्यान बेलवंडी पोलिसांना समजल्याने पोलिस कर्मचारी हसन शेख यांनी जवळच्या गावांना ग्रामसूरक्षा यंत्रणेमार्फत सूचित केले.
पिंपळगाव पिसा गावचे पोलीस पाटील शिवणकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील पोलीस मित्रांना सोबत घेऊन गावात गस्त सुरु केली. गस्त सुरु करताच त्यांना दुचाकीवरून आलेले चोर दिसून आले.
चोरांना पाहताच पोलिस पाटील शिवणकर आणि पोलिस मित्रांनी चोरांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी दरोड्याचे साहित्य जागेवर आणि दुचाकी उसाच्या शेतात टाकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.