अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- पाथर्डी तालुक्यातील भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. तालुक्यात मोहटे व चिंचपुर पांगुळ या दोन गावात एकाच दिवशी भरदिवास चोरी करत चोरट्यांनी साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोहटे गावातील राज्य मार्गावरील पाऊतका वस्तीवर राहणार्या अंबादास अश्रू दहिफळे यांच्या घरी दुपारी चोरीची घटना घडली. दहिफळे यांच्या घरातील सदस्य शेतात कामाला गेले होते.
घरी आले असता घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात चोरी झाल्याचे त्यांना आढळून आले. मोठ्या स्वरूपात असलेला ऐवज भरदिवसा डल्ला मारत चोरट्याने लंपास केला आहे.
तर दुसरी घटना तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील डॉ. अशोक मुरलीधर बडे यांच्या राहत्या घरी घडली. बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 62 हजाराचा ऐवज पळवला आहे.
बारा हजार रोख रक्कम आणि पन्नास हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याच्या हाती लागले आहेत. तो ऐवज घेऊन चोरट्याने पोबारा केला आहे.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बडे हे पुढील तपास करीत आहे.