अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून चोरटे धुमाकूळ घालत आहे. चोरट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरामधील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दुलेचांदगाव येथे आठ दिवसांपासून गावातील वस्त्यांवरील रोहित्र बंद करून चोरीचा प्रकार घडत आहे. घरांवर दगडफेक करणे, शेळ्या, कोंबड्या, दागिने चोरण्याच्या प्रकार सुरू आहे.
म्हातारदेव ढाळे, मच्छिंद्र शेळके व बाळासाहेब घोरपडे यांच्या वस्तीवर चोरांनी दरवाजे मोडून गेट तोडून दगडफेक करत चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु इतर शेतकरी मदतीला आल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
यावेळी चोरटयांनी सुनील घोरपडे यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु आहे. याबाबतची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान चोरट्यांच्या दहशतीतून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी होऊ लागली आहे.