मंदिरातील चोरी गेलेल्या दागिन्यांसह चोर अद्यापही ‘गुमशुदा’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मालिन होत आहे, तर दुसरीकडे या घटनांना रोख लावण्यात तसेच चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना येणारे अपयश यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक केली आहे. दरम्यान दागिने चोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे.

त्यामुळे त्याला पुन्हा कोर्टापुढे सादर केले जाणार आहे. भास्कर खेमाजी पथवे (वय ४५, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) असे या आरोपीचे नाव आहे. चोरट्यांचा शोध लागत नसल्यामुळे ग्रामस्थांनी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते.

पण पोलिसांनी तेव्हा तपासाकरिता आणखी मुदत हवी असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मंदिरातील चोरीचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरुन भास्कर पथवे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्याला सोनई पोलिसांनी अटक करुन नेवासे सत्र न्यायालयात हजर केले.

या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता आपल्याला काहीच माहित नसल्याचे पथवे सांगत होता, पण, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे, असे पोलिसांचे म्हणणे होते. पथवेला न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी सुनावली होती.

या पोलिस कोठडीची मुदत आता संपली आहे. त्याला आज पुन्हा कोर्टापुढे सादर केले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24