पीपीई किट परिधान करीत चोरट्यांनी चार लाखांचे मोबाईल चोरले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-  अकोले शहरातील मातोश्री काॅप्लेक्स येथील स्टार मोबाइल शाॅपी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून पीपीई किट परिधान करीत तीन चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपये किमतीचे मोबाइल संच चोरून नेले.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत असलेल्या समीर सय्यद यांच्या स्टार मोबाइल या दुकानातून बुधवारी मध्यरात्री २ वाजून २७ मिनिटांच्या दरम्यान चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरातून दिसून येत आहे.

यावेळी चोरट्यांनी दुकानाचे शटरचे लॅाक तोडून दुकानात प्रवेश करत तीन ते चार लाख रुपयांचे मोबाइल सोबत आणलेल्या गोणीत भरून नेले. दुकानातील वस्तूंची तोडफोडही केली.

हा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त झाला असून त्यात तीन चोर चोरी करताना दिसून येत आहेत. त्यांनी चक्क पीपीई किट सारखा पांढरा पोषाख परिधान केला आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी लक्षात आली. मातोश्री काॅम्प्लेक्सचे मालक दत्तात्रय धुमाळ हे घराबाहेर पडत असताना त्यांना दुकानाच्या शटरचे लॅाक तुटलेेेले दिसले.

त्यांनी दुकानदार समीर सय्यद यांना फोन करून माहिती दिली. समीर सय्यद यांनी प्रत्यक्ष घटनेची माहिती अकोले पोलिसांना दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24