अहमदनगर बातम्या

तहान भागविणारे हातपंप ठरु लागले ‘बुजगावणे’

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह परिसरातील ग्रामस्थांची तहान भागविणारे हातपंप देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आज रोजी इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कुपनलिकांचा वाढता वापर, सहज विकतचे उपलब्ध होणारे पाणी आणि पाणीपुरवठा योजनांचा विस्तार, यामुळे हातपंपांचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे. प्रशासनाने याची दखल घेत गावोगावी सर्वेक्षण करून नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ग्रामीण भागातील ग्रामस्थांना सहज पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी हातपंपाची उभारणी करण्यात आली. गावोगावी अनेक वर्षापासून याच हातपंपावर ग्रामस्थ आपली तहान भागवीत आहेत. घरगुती वापरासाठी देखील या हातपाच्या पाण्याचा वापर होतो. कालांतराने कुपनलिका, पाणीपुरवठा योजनेचा विस्तार, सहज उपलब्ध होणारे विकतचे पाणी, यामुळे प्रशासनाकडून हातपंपाकडे दुर्लक्ष होत गेले. हातपंपाची देखभाल दुरुस्ती न झाल्याने अनेक हातपंप आज रोजी बंद पडलेले आहेत.

हातपंपांचे दांडे गायब असणे, पाण्याची पातळी घालवलेली, भूगर्भातील पाईप कमी पडणे, चेन तुटून पडणे, आदी कारणामुळे हातपंप बंद आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाव, वाडी, वस्ती शाळा, परिसरातील हातपंप केवळ बुजगावणे म्हणून उभे असून नसल्यासारखी त्यांची अवस्था झालेली आहे.

■गावातील अनेक वर्षापासून बसवलेले हातपंप नादुरुस्त अवस्थेत धुळखात पडलेले आहेत. या हातपंपाची दुरुस्ती वेळेत करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. हातपंप दुरुस्त झाल्यास ग्रामस्थांची पाण्याची समस्या सुटण्यास मोठी मदत होईल. यशंवत (वाय.डी.) कोल्हे. शहरटाकळी,

■नादुरुस्त असलेल्या हातपंपांची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पुढाकार घेण्यात येईल, हातपंपाची दुरुस्ती झाल्यास ग्रामस्थांना पाण्याची पर्यायी सुविधा उपलब्ध होईल. सविता खंडागळे, उपसरपंच शहरटाकळी.

■गावात असलेल्या हातपंपाचा विजेची समस्या असताना मोठा आधार ठरत आहे. आजही अनेक ठिकाणी हातपंपाच्या पाण्यावर ग्रामस्थ आपली तहान भागवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाने हातपंप दुरुस्त करून सुरू ठेवावे. संतोष वाघ, सामाजिक कार्यकर्ते. मठाचीवाडी

Ahmednagarlive24 Office