अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- शहरात दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. याला रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभे करणारेही कारणीभूत आहेत. आता अशा वाहन चालकाविरूध्द कोतवाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तिघांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. मंगळवारी पोलिसांनी ही कारवाई केली. भिंगारवाला चौक येथे विजय विठ्ठल होले (रा. नालेगाव, अहमदनगर) यांनी त्यांची रिक्षा वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने उभी केली होती.
सहाय्यक फौजदार अशोक सरोदे यांनी पथकासह होले यांच्या वाहनावर कारवाई करत ते ताब्यात घेतले. सरोदे यांच्या फिर्यादीवरून होले यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीपेठ कार्नर येथे सयाजी नामदेव कर्डिले (रा. केडगाव) यांनी त्यांची रिक्षा रस्त्याच्या दुतर्फा उभी केली असल्याचे पोलीस नाईक राहुल गवळी यांनी ती ताब्यात घेतली. त्यांनी कर्डिलेविरूध्द कोतवालीत गुन्हा दाखल केला.
तसेच विशाल गणपती वेस समोर सज्जाद बाबामिय खान (रा. इंम्परिअल चौक, अहमदनगर) याने त्याची रिक्षा वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली होती.
रिक्षा ताब्यात घेत त्याच्याविरूध्द पोलीस नाईक गवळी यांच्या फिर्यादीवरून कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.