अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- राज्यभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६ नोव्हेंबर रोजी आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला होता. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
यात वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे तसेच स्टाफ नर्स सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंत यांचा समावेश आहे. दरम्यानसिव्हिल हॉस्पिटलमधील आग प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. विशाखा शिंदे यांच्या विषयीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियातून राज्यभरात व्हायरल झालीय.
यात डॉ. शिंदे यांनी काय गुन्हा केला, असा सवाल विचारून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉ. विशाखा शिंदे या अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे अस्थीरोग विभागात पदव्युत्तर पदविका करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत.
आगीच्या कारणाचा शोध पोलीस यंत्रणा करत आहे. या आगीत होरपळून काही रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. डॉ. विशाखा त्या दिवशी या विभागात ड्युटीवर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या काही परिचारिका आणि डॉ. विशाखा यांना दोषी ठरवले गेले.
आरोग्य विभागाने यांना निलंबित केले तर पोलीस विभागाने यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली. निलंबित केल्याच्या तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली.
परंतु पोलीस विभागाने मात्र त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि डॉ. विशाखा यांच्या अडचणींत वाढ झाली. त्या आजतागायत कोठडीमध्येआहेत आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स ( मार्ड ) ही महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची सगळ्यात मोठी संघटना आहे. तीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.