Ahmednagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी दिलेला राज्य घटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार शरद पवार यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे खासदार पवार बोलत होते. खासदार पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत डॉ. आंबेडकर यांच्याकडे पाणी व वीज हे खाते होते. त्यातून त्यांनी धरणांची निर्मिती करण्यासह पाण्यापासून वीजनिर्मिती करून भारताला एक नवी दृष्टी दिली.
संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आ. थोरात म्हणाले की, ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे.
राज्यभरातील हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली. सर्वसामान्यांचा सन्मान करणे हे त्यांचे वैशिष्ट्य असून कृषी मंत्री पदाच्या काळात सहा वर्षे पवार यांच्याबरोबर काम करताना राज्याचे विक्रमी कृषी उत्पन्न केले. राज्यातील प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती असलेले नेतृत्व खा. पवार असल्याचे ते म्हणाले.