अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभुमी असलेल्या राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे.
आ. नीलेश लंके यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुपे येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर
आ. नीलेश लंके यांनी बिनविरोध निवडणूक करा गावासाठी २५ लाख रूपयांचा निधी घ्या असे आवाहन केले होते. आ. लंके यांच्या या आवाहनाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी स्वागत केले होते.
या निर्णयामुळे गावामधील भांडणे थांबतील व गावाच्या विकासाची घोडदौड सुरू होईल असे मत हजारे व पवार यांनी व्यक्त केले होते . शुक्रवारी आ. नीलेश लंके यांनी सुपे जिल्हा परिषदेच्या गटातील विविध गावांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.
सुपे गटात असलेल्या राळेगणसिद्धीचाही त्यात समावेश होता. राळेगणसिद्धीची बैठक सुरू झाली व काही वेळातच दोन्ही गटांनी बिनविरोध निवडणूक करण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली. या बैठकीस माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी हे प्रमुख कर्यकर्ते उपस्थित होते.