अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. आता श्रीरामपूर व वैजापूर या दोन तालुक्याला जवळून जोडणारा प्रमुख मार्ग असलेला महामार्ग 51 याची प्रचंड दुरवस्था झाली असून परिसरातील नागरिकांसह वाहन चालकाचे प्रचंड हाल होत आहेत.
याठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी सहा महिन्यांपासून निवेदन देत दुरूस्तीची मागणी केली आहे. मात्र अद्यापही बांधकाम विभागाला जाग आलेली नाही.
त्यामुळे याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. नगर-औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांना हा महामार्ग जोडतो. तसेच याच महामार्ग प्रसिद्ध धार्मिक स्थळ सराला बेट आहे.
त्यामुळे या महामार्गावरून नेहमीच वर्दळ असते. तसेच या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याचा संपर्क कमी होऊन परिसरातील बाजारपेठेवर याचा मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. शेतकर्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी ने-आण करताना मोठी अडचण निर्माण होत आहे.
या रस्त्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे यांनी 8 दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासह छावा, प्रहार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी देखील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करत आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved