Ahmednagar news : साईबाबा संस्थानमधील ५९८ कामगारांसह आऊट सोर्सिंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. याची अंमलबजावणी त्रिसदस्यीस समितीने करुन कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचाही निर्णय घेतला. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि,श्री साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयासाठी माझ्यासह सर्वांनाच संघर्ष करावा लागला; मात्र श्री साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळे होऊ शकला. कामगारांना न्याय देणार या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाली असल्याचे समाधान मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.
कामगारांच्या जीवनातील आजचा दिवस नवे चैतन्य घेऊन येणार आहे, हा निर्णय व्हावा म्हणून अनेक वर्षे कामगारांना संघर्ष करावा लागला. निर्णयासाठी मंत्रालय स्तरावर कित्येक बैठकाही झाल्या, पत्रव्यवहार झाले.
अनेकांनी हा निर्णय होण्याआधिच फाटे फोडून कामगारांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला; परंतु मी तुम्हाला शब्द दिला होता. त्याची पूर्तता आज होत असल्याचा माझ्या जीवनातील मोठा आनंद आज होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. हा निर्णय होण्यासाठी महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्यासह मंत्री मंडळातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
पुढे बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीनेसुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन सुरु केली, याचेही समाधान आहे. या निर्णयातून सर्वच कामगारांना न्याय मिळेल.
आता कामगारांची जबाबदारी वाढली आहे. भाविकांना सुविधा देण्यासाठी तेवढ्याच कर्तबागारीने तुम्हाला कार्यरत राहावे लागणार आहे. संस्थानचे उत्पन्न वाढविण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या शहराच्या विकासासाठी प्रत्येक निर्णय हा दुरदृष्टीकोनातून घेतला. विमानतळाला निधी देऊ नका म्हणून अनेकांनी विरोध केला. आज विमानतळाचा फायदा शिर्डीकरांनाच होत आहे.
भविष्यात होणारे थिमपार्क तसेच दोन हजार क्षमतेचा ऑडीटोरीअम हॉल, औद्योगिक वसाहत या सर्व गोष्टी शिर्डी आणि परिसरातील नागरीकांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, सर्वांच्या योगदानामुळे आजचा हा महत्वपूर्ण निर्णय होऊ शकला. मंत्री विखे पाटील यांनी या निर्णयाबाबत दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे सांगून शेवटच्या कामगाराला न्याय देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.