राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, ही माझी शेवटची निवडणूक असल्याने या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे, त्यासाठी जे करावे लागेल ते करू असे परखड मत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दि.१६ ऑगस्ट रोजी घुले यांचा वाढदिवस असून, या वाढदिवसानिमित्त शेवगाव तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि.१३) रोजी बोधेगाव येथील भगवान बाबा लॉन्स येथे महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ आयोजीत केला आहे.
तर दि.१६ रोजी शेवगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात युवक मेळावा पार पडणार असून, या मेळाव्यात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बोधेगाव व परिसरातील कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच बोधेगावात पार पडली. या बैठकीत चंद्रशेखर घुले बोलत होते.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, शेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुके मतदारसंघात येत असून, जे लोक आपल्या तालुक्यात येऊन विकासाची कामे करण्याऐवजी फक्त आपल्यामध्ये वाद लावून देऊन मते मिळवण्याचे काम करतात, त्यांना आता थांबवून आपल्या तालुक्याचा व हक्काचा आमदार विधानसभेत पाठवण्यासाठी तालुक्यातील सर्व मतदार एकसंघ राहिल्यास आपण निवडणूक जिंकू शकतो.
शेवगाव तालुक्यात सव्वादोन लाखाच्या पुढे मतदार असूनसुद्धा आपल्या तालुक्याचा आमदार का होत नाही? आगामी निवडणुकीमध्ये युवकांनी पुढाकार घेऊन निवडणूक कशी जिंकून आणता येईल, यासाठी एकनिष्ठने काम करण्याचे आवाहन घुले यांनी या वेळी केले.
या वेळी काकासाहेब नरवडे पा., पं.स.चे माजी सभापती डॉ. क्षितिजभैय्या घुले पा., राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख कैलासराव नेमाने, मार्केट कमेटीचे अध्यक्ष एकनाथ कसाळ, अॅड. शिवाजीराव दसपुते, नाना पा. मडके, राजेंद्र ढमढेरे, बाप्पासाहेब पावसे, कुंडलिक घोरतळे, राम बामदळे, सुरेंद्र केसभट, नितीन पारनेरे, मिलिंद गायकवाड, बाळासाहेब ढाकणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. बन्नूभाई शेख यांनी आभार मानले.