अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील तिनखडी ग्रामपंचायत सहाव्यांदा बिनविरोध झाली आहे. गावातील सर्व ग्रामस्थांची बैठक होऊन यात सर्व नऊ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे नेते सोमनाथ खेडकर व शिवसेनेचे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाचे संघटक भगवान दराडे यांच्या पुढाकारातून निवडीची प्रक्रिया पार पडली.
यावेळी शिवाजी कंठाळे, बबन खेडकर, पोपट खेडकर, राहुल खेडकर, अजिनाथ खेडकर, सोपान भाबड, विक्रम दराडे, अर्जुन खेडकर, अजिनाथ मारुती खेडकर, सुरेश खेडकर, बाळू खेडकर,
विष्णू कंठाळे, मुरली खेडकर, रामदास खाडे, हरी सानप, कानिफ आंधळे आदींसह गावातील आजी-माजी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
तालुक्यातील टाकळी मानूर जिल्हा परिषद गटात असलेली तिनखडी गावची जवळपास दोन हजार लोकसंख्या आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सुमारे ११५० मतदार आहेत.
पाच महिला व चार पुरुषांना गावाचे विकास काम करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. तिनखडी ग्रामपंचायत पाच पंचवार्षिक बिनविरोध झाली आहे. यंदाची ही सहावी वेळ बिनविरोध होण्याची आहे.