Solar energy : सौर ऊर्जा हा ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत असून, येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने रूफ टॉप सोलर पॅनल बसवून स्वतःची वीजनिर्मिती सुरू केली आहे. कारखान्याने ७५० किलोवॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
त्यातून दररोज साधारण ९ हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे. उसाचे गाळप बंद असताना निर्माण झालेली वीज ऊर्जा महामंडळाला विकली जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी सांगितले, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात साखर कारखान्याने सोलर सिस्टिमचा ७५० किलोवॅट वीजनिर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प कार्यान्वित करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीचा २ कोटी ९० लाख रुपये खर्च अवघ्या अडीच ते तीन वर्षांत वसूल होणार आहे. त्याचा कारखान्याला लाभ होणार आहे. कारखान्याने उभारलेल्या सौर ऊर्जेवरील दिशादर्शक रूफ टॉप सोलर प्रकल्पाचे को-जन इंडियाचे संचालक मंडळाच्या बैठकीत कौतुक करण्यात आले.
पुणे येथे को-जन इंडियाच्या बैठकीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष तथा को-जन इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी थोरात कारखान्याने अवघ्या तीन महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित केल्याबद्दल थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा सत्कार केला.
सौर ऊर्जा हा अमर्याद संसाधन आहे, जो सर्वोत्तम अपारंपरिक संसाधन पर्याय आहे. सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापर होईल, यापूर्वीही उभारलेल्या ५,५०० मेट्रिक टन क्षमता व ३० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प हा यशस्वीपणे कार्यरत असून, तो इतरांसाठी दिशादर्शक ठरला आहे. राज्यात सहकारी साखर कारखान्यात उभारलेला हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे.-बाबा ओहोळ, अध्यक्ष