अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- कोरोना सारख्या संकटातून बाहेर येत बीड जिल्ह्यातील हिंगणीसारख्या अत्यंत छोट्या गावाने ईश्वराचे आभार मानत संत भगवानबाबासह अन्य संतांच्या मंदिराचे काम लोकवर्गणीतून पूर्ण करत श्रीक्षेत्र भगवानगड विकासासाठी तब्बल ४४ लाख रुपयांचा विकास निधी जाहीर करून गडाच्या एक दिवसीय देणगीचा इतिहास रचला आहे.(
Rs 44 lakh for Bhagwangad development)गडाचे महंत न्यायाचार्य डाॅ. नामदेव शास्त्री यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने भगवानगडाचा विकास हाती घेतला असून बीड व नगर जिल्ह्यात ग्रामीण, धार्मिक पर्यटनात अग्रेसर असलेला भगवान गड कोरोना नंतरच्या परिस्थितीतून पूर्वपदावर येत आहे.
गेले दोन वर्ष मंदिर बंद असल्याने महंतांनी तेथे ठाण मांडून बसत दैनंदिन विकासकामांवर लक्ष केंद्रित केले. भाविकांकडून देणग्या येण्याचे प्रमाण सुद्धा आता वाढत आहे. यापूर्वी हिंगणी येथे भगवान गडाचा नारळी सप्ताह झाला होता.
महंतांच्या आध्यात्मिक व धार्मिक कार्याने प्रभावित होऊन ग्रामस्थांनी गडाच्या विकास कार्याला मदत देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या अडीचशे घरांचे गाव संपूर्ण बागायती असून अत्यंत धार्मिक व भगवान गडावर श्रद्धा असलेले आहे.
डाॅ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण सोहळा झाला. यासाठी संपूर्ण गाव सडा-रांगोळ्यांनी सजले. भव्य मिरवणूक निघाली मुख्य कार्यक्रमात ग्रामस्थांनी एनवेळी भगवान गडासाठी मदतीची घोषणा करण्यास प्रारंभ केला.
बघता बघता ती रक्कम तब्बल ४४ लाखांच्या घरात गेली. अजूनही प्रयत्न करून ५१ लाखांची मदत देण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. गावकऱ्यांच्या अशा दानशूर वृत्तीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.