मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षीचा दहीहंडी उत्सव रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे यावर्षीचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी उसनवार व कर्ज काढून खरीप हंगामाची पिके उभी केली होती.

परंतु जवळपास एक महिन्यापासून मतदार संघात पाऊस पडला नाही. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आपले सण, उत्सव साजरे करण्यामागे परंपरा व संस्कृती आहे.

त्यामुळे आजही कम्प्युटर, मोबाइलच्या काळातही आपल्या सण-उत्सवांचे महत्त्व कमी झालेले नाही. परंतु यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून

त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत कोणताही उत्सव साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.