अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही शासन मागण्या मान्य करत नसल्याने
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाचा शिक्षक दिन ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याचे पत्र शासनास दिले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ टकले यांनी दिली.
शिक्षकांना उपाशीपोटी अध्यापन कार्य करावे लागत आहे . महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी दि ०३/०२/२०१८ रोजी चर्चा करून शासनाने लिखित स्वरूपात शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, दि १८/०२/२०२० रोजी एका महिन्यात या मागण्यासंदर्भात आदेश काढू असे आश्वासन मान शिक्षण मंत्री महोदयांनी दिले आहे.
परंतु अद्याप आदेश काढले नाहीत त्यानंतर वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण मंत्री चर्चासुध्दा करीत नाहीत त्यामुळे शिक्षकसमस्या निराकरणासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने यंदाचा शिक्षकदिन हा काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचे
पत्र मान शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांना दि २८/०८/२०२० रोजी ई-मेल ने दिलेले आहे. या दिवशी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्याफिती लावून काम करतील व पदाधिकारी आपल्या कार्यालयासमोर निदर्शने करून आपणास निवेदन सादर करतील. राज्य महासंघाला मान शिक्षण मंत्र्यांनी आंदोलन करण्यास भाग पाडले आहे. तातडीच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) मूल्यांकन पात्र घोषित, अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे. केवळ घोषित यादीचा विचार न करता अघोषित यादीतील शिक्षकांना देखील हे वेतन अनुदान देण्यात यावे.
२) दशकाहून अधिक काळ २००२-२००३ पासून वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे.
३) आय टी विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे. आय टी चे शिक्षक गेल्या १० वर्षांहून अधिक काळ विनावेतन/अत्यल्प वेतनावर कार्यरत आहेत.
कोरोनाच्या या संकटकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आय टी शिक्षक संबधित शाळा महाविद्यालयात अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत.
बोर्डांच्या परीक्षेत ऑनलाईनची सर्व कामे हे शिक्षकच करीत आहेत, त्यामुळे या विनावेतन, अत्यल्प वेतन असणाऱ्या शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतनअनुदान देणे गरजेचे आहे.
४) सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
५) शासकीय कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. शासन वारंवार फसवणूक करत आहे.
त्यामुळे महासंघाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती सेक्रेटरी मछिन्द्र दिघे, अश्रुबा फुंदे, सतीश शिर्के, सोपानराव कदम यांनी दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved