अहमदनगर बातम्या

उत्कृष्ट काम करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून शिक्षकदिनी मिळाले ‘हे’ गिफ्ट…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस. दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून २०२४ च्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांमधून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान यंदा तालुकानिहाय १४ शिक्षक व १ केंद्रप्रमुख अशा १५ जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

शिक्षक पुरस्कारासाठी १०० गुणांची परीक्षा घेणार येते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर १०० गुणांची प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व केंद्रप्रमुखांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये स्वयंमूल्यमापन करून प्रश्नावली जमा केली.

प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी करून ३ शिक्षक व एक केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविण्यात आले.

जिल्हास्तरावरून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख तालुके बदलून त्यांच्यामार्फत परीक्षण करण्यात आले. त्याप्रमाणे प्राप्त झालेल्या प्रस्तावातील शिक्षक व केंद्रप्रमुखांची २५ गुणांची लेखी परीक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

जिल्हा निवड समितीच्या बैठकीत १०० गुणांची प्रश्नावली व लेखी परीक्षेचे २५ गुण अशा १२५ गुणांपैकी ज्याला सर्वात जास्त गुण मिळाले असा प्रत्येक तालुक्यातील पुरस्कारासाठी आला. एक शिक्षक निवडण्यात नंतर नाशिक विभागीय आयुक्तांनी निवड झालेल्या शिक्षकांच्या यादीला बुधवारी मान्यता दिल्यानंतर जिल्हा शिक्षक पुरस्कारार्थीची नावे जाहीर करण्यात आली.

यांना मिळाला पुरस्कार

वर्षा मोहन कचरे (शिंगवेनाईक, नगर), प्रकाश सखाराम नांगरे (सोबलेवाडी, पारनेर), स्वाती दिलीप काळे (पवारवाडी अजनुज, श्रीगोंदा), दीपक प्रभाकर कारंजकर (मिरजगाव, कर्जत), बाळू गंगाराम जरांडे (पवारवस्ती, जामखेड),नामदेव तात्याबा घायतडक (सोमठाणे नलवडे, पाथर्डी), गोरक्षनाथ भिकाजी बर्डे (कहेटाकळी, शेवगाव), सुनील तुळसीराम आडसूळ (सोनवणेवस्ती, नेवासा),सुनील महादेव लोंढे (उंबरे, राहुरी), योगेश भानुदास राणे (शिरसगाव, श्रीरामपूर),ललिता सुभाष पवार (गमेगोठा, राहाता),पीतांबर मखमल पाटील (दशरथवाडी, कोपरगाव), संजय एकनाथ कडलग (सावरगाव तळ, संगमनेर),पुष्पा शिवराम लांडे (शिळवंडी, अकोले). केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर रामकिसन जाधव (दहिगावने, शेवगाव).

Ahmednagarlive24 Office