Ahilyanagar News:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण बघितले की काँग्रेसचे असलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापण्यात आले होते व त्या जागी काँग्रेसने हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर केली होती व ते या निवडणुकीत विजयी देखील झाले.
त्यानंतर मात्र लहू कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली होती व त्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली. परंतु त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु आता त्यांनी आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तयारी सुरू केली असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
त्यांनी नुकतेच श्रीरामपूर शहरातील माजी नगरसेवक, ग्रामीण भागातील व राहुरी तालुक्यातील 32 गावातील कार्यकर्त्यांचे आभार मानण्याकरिता संपर्क कार्यालयात आभार सभेचे आयोजन केले होते व या प्रसंगी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
श्रीरामपूर सोडून कुठेही जाणार नाही – माजी आमदार लहू कानडे
श्रीरामपूर शहरातील माजी नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील व राहुरी तालुक्यातील 32 गावातील कार्यकर्त्यांच्या आभार मानण्याकरिता लहू कानडे यांनी संपर्क कार्यालयात आभार सभेचे आयोजन केले होते व त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, मागील पाच वर्षांमध्ये जी काही मला संधी मिळाली होती त्या माध्यमातून मी श्रीरामपूर मतदारसंघात अनेक विकास कामे केली.
या निवडणुकीत माझा पराभव होईल असे मला अजिबात वाटले नव्हते पण तो झाला. जे वाट बघतात आमच्या जाण्याची, त्यांना जाऊन सांगा की मी कुठेही जाणार नाहीत. वाईट प्रवृत्ती डोळ्यासमोर दिसत असताना राजकारणातून निवृत्त होण्याचा अधिकार आता नाही. आजपर्यंत कधीही कुठेही मी भाग घेत नव्हतो.
परंतु यापुढे मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूक मोठ्या ताकदीनिशी लढवणार असून मतदार संघातील प्रत्येक गावात आणि वार्डात राष्ट्रवादीची स्थापना करणार असल्याची घोषणा माजी आमदार लहू कानडे यांनी या निमित्ताने केले.यावेळी पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाने विश्वासघाताने आपले तिकीट कापले.
परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाठबळ व आपल्याला तिकीट दिले. परंतु या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालेला होता. जर काँग्रेसने अगोदरच सांगितले असते तर ही वेळच आली नसती व विजय सोपा झाला असता असं देखील त्यांनी म्हटले. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली.
यामागील प्रमुख कारण राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रहित व समाजाचा विचार घेऊन पुढे चालणारा पक्ष आहे आणि मीही तोच विचार घेऊन आजपर्यंत चाललो आहे. श्रीरामपूर मतदारसंघातील मायबाप जनतेने मला पाच वर्षे संधी दिली व त्या आमदारकीचा उपयोग लोकांना त्रास देण्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी मी मतदार संघाच्या विकास कामांसाठी केला असे देखील त्यांनी म्हटले.
आयोजित करण्यात आलेल्या या आभार सभेला माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, अजित कदम तसेच अमृत धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अरुण नाईक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.