अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील कुठल्याच भागामध्ये कचरा दिसणार नाही यासाठी काम करावे. घंटागाडीचे नियोजन करून वेळेवर कॉलिंगमध्ये जाण्यासाठी नियोजन करावे.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला आहे.
मनपाच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी शहरातील स्वच्छतेची पाहणी करून अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी स्वत: तारकपूर रस्त्यावर उभे राहून कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेतली. यावेळी ते म्हणाले की, अहमदनगर शहर हे स्वच्छ, सुंदर, हरित करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
आपले शहर हे कचराकुंडी मुक्त झाले असून, नागरिकांनी आपला कचरा हा घंटागाडी मध्ये टाकावा. जेणेकरून आपले रस्ते स्वच्छ राहण्यास मदत होईल.
या कामासाठी नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे. भारत स्वच्छ अभियानामध्ये आपण दरवर्षी भाग घेत असून त्यामध्ये आपल्याला मानांकन प्राप्त होत आहे.
त्यामुळे नागरिकांना कचरा व्यवस्थापन करण्याबाबत सूचना कराव्यात अन्यथा रस्त्यावर कचरा दिसल्यास कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.