Ahmednagar News : शेवगाव शेअर मार्केट व्यावसायिकास चाकूचा धाक दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी देण्यासाठी धमकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव शिवारात २९ फेब्रुवारीला ही घटना घडली होती.
महेश मच्छिंद्र जगताप (रा. गेवराई, ता. नेवासे) व योगेश शिवाजी वावरे (रा. नजीक चिंचोली, ता. नेवासे) अशी आरोपींची नावे आहेत. व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, २९ फेब्रुवारी रोजी दुपारी साईनाथ कवडे हे आपल्या शेतात काम करीत असताना, वरील दोन्ही आरोपी तेथे आले. चाकूचा धाक दाखवून ‘तू शेअर बाजारात खूप पैसा जमा केला आहे. त्यामुळे आम्हाला दर महिन्याला ७ लाख रुपयांचा हप्ता चालू कर,
नाहीतर तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करू’ अशी धमकी त्यांनी दिली. मात्र, खंडणी देण्यास कवडे यांनी नकार दिला. त्यानंतर दोघांनी कवडे यांच्याविरोधात पोलिस अधीक्षक, शेवगाव पोलिस ठाणे व इतर ११ कार्यालयांत तक्रार अर्ज केले.
नंतर १६ मार्चला पुन्हा आरोपी जगताप याने कवडे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यानंतर पुन्हा १३ एप्रिल रोजी पैसे न दिल्यास तुझ्या कुटुंबाला धोका होऊ शकतो, अशी धमकी दिल्याचे कवडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.