अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : अधिकाऱ्याला धमकीचे मॅसेज ! ‘त्या’ मुख्याध्यापकाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल,शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव बीटाचे विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांना शनिवारी (दि. २७) रात्री व्हॅट्सअॅपद्वारे एका शाळेतील मुख्याध्यापकाने धमकीचे संदेश पाठवल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

धमकी देणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.विस्तार अधिकारी डॉ. गाडेकर हे बोधेगाव येथे कार्यरत असून, ते छत्रपती संभाजीनगर येथे राहातात. गाडेकर यांनी राक्षी येथील मुख्याध्यापक पोपट सूर्यवंशी यांच्या गैरहजेरीबाबत वरिष्ठांना कळवले होते.

त्यामुळे वरिष्ठांकडून सूर्यवंशी यांना गैरहजेरीबाबत जाब विचारण्यात आला. तक्रार केल्याचा राग मनात धरून मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी शनिवारी (दि. २७) च्या रात्री व्हॅट्सअॅपवरून गाडेकर यांना एकूण सात मॅसेज पाठविले.

यामध्ये राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येचा उल्लेख करून या बातमीची लिंक शेअर केली. काळजीपूर्वक वाचा, काळजी घ्या. तुम्ही तुमच्या चमच्यांना सांगा वाचायला, पण मी मीच आहे, ओवरटेक करणार आहात का…?

तर करा पण अॅक्सिडेंट झालाच तर…? असा मजकूर असून, शेवटच्या संदेशात पाठवलेले मेसेज पुरावा समजून जर वळवळ झालीच तर…? सल्ला नाही, पण विनम्र होऊन सांगेल, मेसेज सूर्यवंशीचा आहे, ज्याला तुम्ही नोटीस पाठवली,

जि.प. अधिनियमाची, याचा अर्थ सूर्यवंशी मुर्ख नाही, तुमचे सगळे आर्टिकल तयार आहेत राजे, फक्त शंख फुका, मग समजेल मी पगार कोणाचा घेतो, असा मॅसेज पाठवला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यापूर्वीही सूर्यवंशी यांनी प्रशासकीय कामकाजाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रशासनाची बदनामी करणारे संदेश पाठवले होते. आता तर जीविताला धोका निर्माण करणारे संदेश मला पाठवले असून, त्यांच्या विरोधात योग्य कारवाई होण्यासाठी मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. – डॉ. शंकर गाडेकर : विस्तार अधिकारी, पं.स. शेवगाव

गेल्या ३४ वर्षांपासून मी जिल्हा परिषदेत नोकरी करत असून, अद्यापही माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नसून कर्तव्यातदेखील हलगर्जीपणा झालेला नाही. सध्या माझ्यावर होत असलेले आरोप खोटे व चुकीचे असून, मला जाणून-बुजून टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी गाडेकर यांना कोणतेही धमकीचे संदेश पाठवलेले नाहीत, असा प्रकार हा घडलाच नाही – पोपट सूर्यवंशी : मुख्या. जि.प. शाळा, राक्षी.

आम्ही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, शिक्षण क्षेत्रात असे प्रकार निंदनिय आहेत, या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

Ahmednagarlive24 Office